मुंबई - 'उद्योग क्षेत्रात गुंडगिरी सहन केली जाणार नाही. संभाजीनगर जिल्ह्यात उद्योग क्षेत्र वाढत असताना तिथले वातावरण खराब करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. राज्य शासन असे प्रकार सहन करणार नाही. अशा प्रकारावर कठोर कारवाई केली जाईल', अशी ग्वाही संभाजीनगरचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (11 ऑगस्ट) दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढत आहे. उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. औरंगाबाद शहरातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये तसेच पेट्रोल पंप आणि चारचाकी विक्री केंद्रात दादागिरीचे प्रमाण वाढत आहे. एका कर्मचाऱ्यास पूर्ण क्षमतेने काम करण्याची लेखी हमी मागितल्याने त्याने हात धुण्याच्या साबणाचे पाणी पिले. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दहा-बारा जणांच्या जमावाने भोगले अॅटोमोबाईल्स या कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
गुंडांना बसणार चाप
'औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर करवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असली तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहेत. हा प्रकार गंभीर आहे. औरंगाबाद सारखे शहर उद्योगात भरारी घेत असताना इथे मोठ्या प्रमाणात बाहेरची गुंतवणूक, कंपन्या येत आहेत. त्यात अशा गुंडगिरीच्या प्रकारामुळे या प्रक्रियेला गालबोट लागू शकते. उद्योजकांना चांगले वातावरण मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात अशा गुंडगिरीला अद्याप थारा दिला जाणार नाही. उद्योगपतींना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. शिवाय लवकरच औरंगाबादला जाऊन मी उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. त्यांच्या तक्रारी, मागण्या जाणून घेणार आहे', असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय दुर्घटना, ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांना २४ लाखांचा दंड