औरंगाबाद - कोरोनाचा फटका राज्यातील कला शिक्षकांना बसला आहे. त्यामुळे कला शिक्षकांच्या मदतीला येण्याचे आवाहन करणार पत्र कला शिक्षक संघटनेने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लिहिले आहे. मागील एक वर्षांपासून कला शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने मदत करण्याचे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.
राज्यातील कला शिक्षक झाले बेरोजगार
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी मुभा देण्यात आली. मात्र, त्यात कला शिक्षण समाविष्ट नाही. परिणामी अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षापासून एलिमेंट्री इंटर्मिजीएट सारखा अभ्यासक्रम बंद आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक बेरोजगार झाले आहेत. राज्यातील 25 हजार कला शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने, राज ठाकरे यांनी सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी याकरिता पत्र लिहिण्यात आल्याची माहिती औरंगाबाद चित्रकार संघटनेचे अध्यक्ष कल्याण तारे यांनी दिली आहे.
या आहेत मागण्या
1) ऑनलाइन चित्रकला शिकवण्याची परवानगी द्यावी.2) कला शिक्षकांना आर्थिक मदत द्यावी.3) लॉकडाऊन संपल्यावर चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यासाठी दालन 50 टक्के सवलतीत द्यावे.4) चित्रकला, व्यंगचित्र, शिल्पकला, जीडीआर्ट, कमर्शियल आर्ट, वारली पेंटिंग यांच्या उत्थानासाठी कलामंडळ स्थापन करावे.5) खाजगी आणि जिल्हा परिषद शाळेत कला शिक्षकांची पदभरती करावी. अशा विविध मागण्या चित्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.