औरंगाबाद : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका स्त्री रुग्णालयात डॉक्टर पती-पत्नीकडून महिलांचा गर्भपात करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बिडकिन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. महिलेचा गर्भपात केल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. अमोल जाधव, डॉ. सोनाली जाधव असे या डॉक्टर पती-पत्नीचे नाव आहे.
तीन - चार वर्षांपासून सुरू होता प्रकार : डॉ. अमोल जाधव गेल्या तीन-चार वर्षापासून चितेगाव येथील पांगरा रोडवर औरंगाबाद स्त्री रुग्णालयाच्या नावाने हॉस्पिटल चालवत होता. याच रुग्णालयात तो आणि त्याची पत्नी गर्भपात देखील करायचे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अवैधपणे हे काम सुरू होते. मात्र याची कुणकुण देखील आरोग्य विभागाला माहिती नसल्याने आश्चर्य वक्त केले जात आहे. दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने आत्तापर्यंत किती गर्भपात केले असतील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
महिलेला त्रास झाल्याने प्रकार आला उघडकीस : डॉ. अमोल जाधव आणि त्याच्या पत्नी डॉ सोनाली जाधव आपल्या रुग्णालयात एका महिलेचा 2 जानेवारीला गर्भपात केला होता. कोणताही अनुभव नसताना आणि शासकीय परवाना नसतानाही त्यांनी गर्भपात केला. ही शस्त्रक्रिया करताना महिलेची प्रकृती बिघडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे डॉक्टर अमोल जाधव याने महिलेला औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयाने देखील उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेला एका शासकीय रुग्णालयात दाखलकरून डॉक्टर अमोल जाधव फरार झाला. त्यानंतर संबंधित शासकीय रुग्णालयाने याबाबत बिडकीन पोलिसांना माहिती दिल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
आरोग्य यंत्रणा झाली घडबडून जागी : या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर पोलीस आणि आरोग्य विभागाने रात्री उशिरापर्यंत डॉक्टर अमोल जाधवच्या रुग्णालयात तपासणी करत पंचनामा केला. याप्रकरणी बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर पती-पत्नी विरोधात गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत किती अवैध गर्भपात झाले याबाबत पोलीस आणि आरोग्य यंत्रणा तपास करत आहे.
हेही वाचा : Kasba By Election: भाजपने तिकीट न दिल्याने शैलेश टिळक झाले भावूक, म्हणाले...