औरंगाबाद - घरगुती वादातून वृद्ध पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली त्यानंतर पतीनेही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा खळबळजनक प्रकार रविवारी (दि. 17) पहाटे गंगापूर तालुक्यातील टाकळीचीवाडी येथील गट क्र. नऊमध्ये घडला. चंपालाल तान्हासिंग बिघोत (वय 55 वर्षे) आणि गंगाबाई चंपालाल बिघोत (वय 48 वर्षे), अशी दोघांची नावे आहेत.
गंगापूर तालुक्यातील टाकळीचीवाडीमधील घराच्या ओट्यावर बिघोत पती-पत्नी झोपले होते. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चंपालाल बिघोत यांनी मुलगा राहुलच्या घराचा दरवाजा बाहेरुन बंद केला. त्यानंतर ओट्यावर झोपलेल्या पत्नी गंगाबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. गंगाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यावेळी राहुलला मारहाणीचा आवाज येत होता. पण, त्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरुन बंद होता. राहुलने खिडकीतून पाहिल्यावर त्याला गंगाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसूल्या. त्याने तात्काळ दुसऱ्या दरवाजाने धाव घेतली. शेजारच्या नातेवाईकांना बोलावून त्याने गंगाबाई यांना तात्काळ घाटीत दाखल केले. तर दुसरीकडे चंपालाल यांनी शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस पाटील उदयसिंग जारवाल यांनी घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक रवीकिरण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चंपालाल यांचा मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय कुलकर्णी, दीपक गाडेकर, दिनेश मुंगसे, छगन सलामबाद, महेंद्र खोतकर, विजय खोतकर, जगदिश सलामबाद यांनी चंपालाल यांचा मृतदेह विहीरीबाहेर काढला. यावेळी फॉरेन्सिक लॅब आणि ठसे तज्ज्ञांचे पथकही उपस्थित होते.
हेही वाचा - औरंगाबाद : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल