औरंगाबाद - मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केल. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यत विक्रमी पावस बरसला. नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुखेड तालुक्यातील मोती नाल्यात कार वाहून गेल्याचे माहिती समोर आली. तीन जण वाहून गेले असून, त्यापैकी एक जणास वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.
औरंगाबादेत मुसळधार पाऊस -
औरंगाबाद शहराला जोरदार पावसाने झोडपले. मंगळवारी औरंगाबाद शहरावर सायंकाळी 7 च्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुढील दोन तीन मिनिटात अतिशय रौद्र रूप धारण केले. सुरुवातीच्या तीस मिनिटाच्या काळात पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा 166.75 मीमी नोंदला गेला. तर या तीस मिनिटांच्या कालावधीत 56.2 मी.मी पावसाची नोंद झाली. ही माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास एस औंधकर यांनी दिली आहे.
शहरात उडाली दाणादाण -
मंगळवारी सायंकाळनंतर पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. पिसादेवी गावाकडे जाणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला असून नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. देगलूर तालुक्यातील लख्खा, तुपशेलगाव,सुगाव मनसकरगा या गावांचा संपर्क तुटला असून देगलूर-नांदेड मार्गावर असलेल्या वझरगा येथील मन्याड नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे देगलूर व नांदेडकडून येणारी वाहतूक खोळंबली आहे. हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा वाढल्याने मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरण 90 टक्के भरल्याने धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लहान-मोठ्या सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत -
लातूर शहराची तहाण भागवणाऱ्या मांजरा धरणातील जलसाठा 63.73 टक्के जलसाठा झाला असून 11 बंधारे पूर्णपणे भरले आहेत. त्याचबरोबर रेणापूर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी मंगळवारी सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तेरणा नदीवरील राजेगाव बंधाऱ्यात 96.83, किल्लारी 92.10, मदनसुरी 80.20, लिंबाळा 87.63 जलसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. लहान-मोठ्या सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यात मंगळवारी पावसाने कहर केला होता. क्षेत्र कपीलधार येथून दोन मुले वाहुन गेल्याची घटना घडली असून एकाला वाचवण्यात यश आले तर एकजण बेपत्ता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असल्याने सर्वच नदी, नाले भरून वाहत आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत कोसळत असल्याने मांजरा, तेरणा नद्या भरून वाहत आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 98.5 टक्के पाऊस झाला आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, पिके पाण्याखाली..जनावरे गेली वाहून