औरंगाबाद : औरंगाबाद जळगाव रस्त्यावरील रस्ता रुंदीकरण मोहीम ही गेल्या काही वर्षात रखडली होती. हर्सूल भागात जमीन अधिग्रहण झाले नसल्याने या मोहिमेला ब्रेक लागला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली होती. हर्सूल भागातील मंदिर ते जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत रुंदीकरण मोहीम झालेले नव्हते. अरुंद रस्ता असल्याने वाहनांना येजा करण्यात अडसर निर्माण झाली होती. मात्र, रुंदीकरण करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याने, पाडापाडीला सुरुवात झाली. रविवारी नागरिकांनी स्वतःहून मालमत्ता रिकाम्या करण्यास सुरुवात केली. तर सोमवारी सकाळी प्रशासनाकडून मालमत्ताची पाडापाड सुरू झाली, यात काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मोबदला वेळेत नसल्याने नागरिक नाराज : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाण्यासाठीचा महत्वाचा रस्ता असलेल्या जळगाव रस्त्यावर हर्सूल भागात जमीन अधिग्रहण झालं नसल्याने रुंदीकरण मोहीम रखडली होती. नागरिकांचा मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला यश मिळाले नाही. परिणामी नागरिकांनी रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या मालमत्ता देण्यास नकार दिला. मात्र, आता रस्ता रुंदीकरणाबाबत दर निश्चित करण्यात आले आहेत. असं असलं तरी अद्याप मोबदला न देताच मालमत्ता रिकामा करण्याची नोटीस दोन दिवस आधी नागरिकांना देण्यात आली. तर पुढील पंधरा दिवसात मोबदला मिळेल असं आश्वासन नागरिकांना देण्यात आल. जी 20 परिषदेच्या अनुषंगाने ही तयारी करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
मोबदला कमी का? : नागरिकांना निश्चित करून दिलेले दर कमी असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रस्ता रुंदीकरण करणे ही काळाची गरज आहे. वाहतूक सुरळीत रहावी आणि अपघात होऊ नये यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यास हरकत नाही. मात्र, मिळालेला मोबदला अतिशय कमी आहे. एकीकडे समृद्धी महामार्ग तयार करत असताना चार पट अधिकचे पैसे देण्यात आले. मग आम्हालाच कमी पैसे का देण्यात येत आहेत? अशी तक्रार नागरिकांची आहे. इतकच नाही तर मोबदला उशिरा देण्यात येत असून मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी वेळ देखील देण्यात आला नाही. आता ऐनवेळी राहण्याची सोय कशी करायची असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस हे सभ्य नेते! 'त्या' खुलाशावर शरद पवारांची प्रतिक्रिया