औरंगाबाद - करमाड येथे मृत झालेले मजूर कोणत्या कंत्राटदाराकडे काम करत होते आणि कोणत्या कंपनीत काम करत होते. त्या सर्वांची चौकशी करा. या मजुरांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नसेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी भाजप आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे.
रस्त्याने आले तर पोलीस अडवतात. त्यामुळेच या मजुरांनी रेल्वे रुळावरून येण्याचा निर्णय घेतला असावा. रेल्वे रुळावरून कोणीही अडवणार नाही आणि आपल्याला पटकन जाता येईल त्यामुळेच हे मजूर तिकडून आले आणि दुर्घटना घडली, असे मत हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक ठिकाणी लोकांना काम राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांनी आपल्याकडे काम करत असलेल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे.
ज्या कंपनीत काम करतात किंवा कोणत्या ठेकेदाराने यांनी कामासाठी इथे आणले त्या लोकांनी यांची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, काम बंद झाल्यावर त्यांनी जर या मजुरांकडे पाहिलेच नसेल तर हे दुर्दैवी आहे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. जर या मजुरांना या लोकांनी सांभाळले नसेल तर कंपनी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे मत भाजप आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.