औरंगाबाद - चोरट्यांनी एका दुकानाचे शटर उचकटून आतील साहित्य लंपास केले. दुकानात सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येताच चोरट्यानी त्यांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील हनुमान चौकात घडली.
महेश रामेश्वर तोतला (42) रा.एन-2, सिडको यांची हनुमान चौकातील धरतीधन कॉम्प्लेक्समध्ये पुष्पक सॅनिटेशन अँड पेंट या नावाने हार्डवेअर साहित्य विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी शेजारील दुकानदार जेव्हा दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना तोतला यांचे दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनी तोतला यांना लागलीच बोलावून घेतले असता दुकानाचे सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते. चोरीची शंका आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. यावेळी चोरट्यांनी दुकानातील दुकानातील गिझर व लहान मोठे साहित्यासह सुमारे 25 ते 30 हजारांचा ऐवज लंपास केला. तोतला यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये तीन चोरटे दिसत आहे. मात्र दुकानात कॅमेरे असल्याचे कळताच चोरट्यांनी ते सीसीटीव्ही फोडले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर औरंगाबाद पोलीस पुढील तपास करीत आहे.