औरंगाबाद - खराब व्हेंटिलेटर देणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पीएम फंडातून आलेले व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. याबाबत पंतप्रधानांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने आता याबाबत राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम फंडातून जवळपास 150 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. हे व्हेंटिलेटर ज्यावेळी रुग्णांना लावण्यात आले, त्यावेळी पन्नास व्हेंटिलेटर सुरू नसल्याचं समोर आलं आहे. यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी व्हेंटिलेटर बाबत नाराजी व्यक्त केली, हे व्हेंटिलेटर नसून नुसते डब्बे पाठवल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
भाजपाकडून केंद्र सरकारची पाठराखण
पीएम फंडातून आलेले व्हेंटिलेटर खराब असल्याने जलील यांनी जाब विचारला आहे. यावर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली जात आहे. व्हेंटिलेटर बऱ्याच दिवसापासून पडून असल्याने ते खराब झाले, रुग्णालयातील डॉक्टरांना ते वापरता येत नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी हे व्हेंटिलेटर कोणत्या ग्रहावरून मागवले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. इतके तज्ज्ञ डॉक्टर असताना व्हेंटिलेटर वापरता येणार नाही का?, याचं उत्तर केंद्र सरकारने द्याव अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
हेही वाचा - व्हॉट्सअपने नवीन गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे- केंद्र सरकारचे निर्देश