औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील भगवान गडावरील संत भगवान बाबा मंदिराच्या प्रांगणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मेहेगाव येथील भगवान गडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळ अध्यक्ष डॉ. भागवत कराड , आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन नितीन पाटील, कन्नड नगर परिषद नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, सभापती आप्पाराव घुगे, प्रवीण घुगे, गोपीनाथ वाघ, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, अनिल चौरसिया, भाऊसाहेब वाघ, किशोर नागरे, भाऊसाहेब ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात, मी भगवान बाबाला मानते माझी त्यांच्यावर श्रध्दा आहे आणि सगळेच गोपीनाथ मुंडे यांना मानतात. मी सत्तेत होते तेव्हा मागेल त्यांना निधी देऊन कामे दिली आणि विकासाची कामे केली. त्यावेळी, कोणत्याही कार्यक्रमाला वेळ देऊ शकत नव्हते तर, आता निधी देऊ शकत नाही. मात्र वेळ देत आहे असे म्हणाल्या.
माझ्या नावाबरोबर वडिलांचे नाव जिवंत रहावे म्हणून पराभवाने खचले नाही. तर, माझ्यावर वडिलांवर प्रेम करणाऱ्या लोकांची कामे करण्यासाठी जोमाने कार्य करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. या कार्यक्रमाअगोदर हभप रामकृष्ण महाराज सानप यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील गोपीनाथराव मुंडे भक्त, भाजप कार्यकर्ते, सरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कीर्तनात आमदार उदयसिंग राजपूत यांनी नृत्याचा ठेका धरला.
हेही वाचा - 'आपले सरकार सेवा केंद्रा'च्या मार्फत शासनाची फसवणूक, खंडपीठात ग्रामपंचायतीची याचिका