औरंगाबाद- राज्य सरकारने भजन-कीर्तन करण्यास परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात येत आहे. ४ महिन्यांपासून कीर्तन बंद असल्याने वारकरी संप्रदायातील अनेकांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले असल्याने ही विनंती करत असल्याचे संप्रदायाचे म्हणणे आहे.
भजन-कीर्तन केल्याने देवाचे नामस्मरण केले जातेच, मात्र त्याचबरोबर समाज प्रबोधन करण्याचे काम देखील कीर्तनाच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे, भजन कीर्तनाला परवानगी मिळाल्यास त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करणे शक्य आहे. त्यामुळे, कीर्तनाला परवानगी द्यावी, अशी विनंती वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या अनुषंगाने बंद पाळण्यात येत आहे. त्यात मंदिरे बंद करण्यात आली. त्याचबरोबर, धार्मिक कार्यक्रम त्यात सप्ताह आणि भजन-कीर्तन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भजन-कीर्तन बंद असल्याने कीर्तनकारांवर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. भजन कीर्तनाच्या माध्यमातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. एका भजनी मंडळात कीर्तनकार, तबलावादक, विना वादक आणि टाळकरी असा समूह असतो. गावोगावी भजन केल्यावर मिळणाऱ्या मानधनातून या समुहाच कुटुंब चालते. मात्र, कीर्तनबंदीच्या निर्णयाने वारकरी संप्रदायातील कीर्तन-भजन करणाऱ्या लोकांवर आभाळ कोसळले आहे.
दारूच्या दुकानात गर्दी, मग मंदिरात होणाऱ्या गर्दीवरच आक्षेप का?
राज्यात मॉल, दारूची दुकाने, बाजार पेठा उघडण्यात आल्या. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होतच आहे. मग मंदिरात होणाऱ्या गर्दीवरच आक्षेप का? असा प्रश्न वारकरी संप्रदायाकडून केला गेला. कीर्तनाने देवाचे नामस्मरण तर होतेच त्याचबरोबर मनातील नैराश्याची भावना देखील कमी होते. आज कोरोना महामारीत नकारात्मक विचारांमुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशा वेळी भाजनांमुळे काही प्रमाणात या दुर्घटना टाळता येऊ शकतात, असे भारतीय कीर्तन सेनेचे सचिव योगेश माऊली यांनी सांगितले.
त्याचबरोबर, भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोक प्रबोधन करण्याचे काम वारकरी नेहमी करतो. समाजातील अनेक प्रश्नांवर ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे काम आम्ही केले आहे. कोरोनाची भीती दूर करण्यासाठी आणि लोकांनी खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी भजन कीर्तनाच्या माध्यमाचा वापर करता येईल आणि कीर्तनकार आणि समुहाला काम मिळेल, असेही माऊली यांनी सांगितले.
तसेच, कीर्तन करण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून केली गेली आहे. २ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरमधून वारी करणाऱ्या वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली होती. त्याचे सुंदर फोटो काढले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे अमच्यातलेच वाटले. आता त्यांनी भजन-कीर्तनाला परवानगी देऊन ते आमचेच आहेत याची जाणीव आम्हाला करून द्यावी, अशी मागणी योगेश माऊली यांनी केली.
हेही वाचा- "मराठा आरक्षण हे फार मेहनतीने मिळालंय, ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची"