औरंगाबाद - पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या एका १८ वर्षीय तरुणीचा पोलीस भरती प्रशिक्षणच्या पहिल्याच दिवशी मैदानात सराव करीत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. वाळूज पंढरपुरातील रेस लक्ष करिअर अकॅडमी येथे आज सकाळी ही घटना घडली. सीमा भगवान बोकनकर (वय - १८, रा. पंढरपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मृत सीमाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील आजाराने ग्रासलेले आहेत. तर आई मिळेल ते काम करून नवरा, २ मुली आणि एक मुलगा अशा ५ जणांच्या परिवाराचा गाडा हाकत आहे. सीमाला पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने पंढरपूर परिसरातीलच रेस लक्ष्य करिअर अकॅडमीत ओळखीच्या मदतीने काल (बुधवारी) जाऊन सीमाचा प्रवेशाचा अर्ज भरला होता. यासाठी पैसे हळू हळू भरू, असे सांगितले होते. एका गरीब कुटुंबातील मुलगी प्रशिक्षण घेण्यासाठी आल्याने अकॅडमी प्रशासनानेदेखील पैशाचा विचार न करता तिला प्रवेश दिला.
दरम्यान, तिचा आज प्रशिक्षणाचा पहिला दिवस असल्याने आई स्वतः सकाळी ६ वाजता सीमाला सोडण्यासाठी मैदानात गेली होती. प्रक्षिशणही सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच सीमाला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.