गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यात आद्रक पिकांची लागवड यावर्षी जास्त प्रमाणात आहे. आद्रक पीक काढणीला आले, मात्र भाव ढासळल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने आद्रक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी लाखो रुपये खर्च करून आद्रकीची लागवड केली, मात्र उत्पन्न ही घटले. बाजारात 500 ते 1000 तर सरासरी 700 ते 800 रूपये क्विंटलप्रमाणे आद्रकला भाव मिळत आहे. यामुळे आद्रक उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही -
देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह किराणा आदी जीवन आवश्यक वस्तूसह तर शेतीसाठी लागणारे खत, बियाणेसह आदी भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सालभर शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याकडे शेतीमाल असला तर भाव मिळत नाही. शेती नसली की भाव वाढतो, हेच शेतकऱ्यांच्या नशिबी आहे, तशीच काही अवस्था यंदा आद्रक उत्पादक शेतकऱ्यांच्या आद्रकीला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे "आमदानी आठ्ठणी, खर्चा रूपया" अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मागील वर्षी आद्रकीला 3 हजार ते ४ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. यंदाही आद्रकीला भाव मिळेल या अपेक्षेपोटी यंदा अनेक शेतकऱ्यांनी आद्रकीचे उत्पन्न घेतले मात्र बदलत्या वातावरणामुळे आद्रकीचे उत्पन्न तर घटले आहे. बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आद्रक पिकासाठी लागणार खर्च -
आद्रक लागवडीसाठी एकरी दहा क्विंटल आद्रक बेन 35 हजार रुपये, शेण खत तीन ट्रॅक्टर ट्राली 15 हजार, रासायनिक खत चार ढोस 20 हजार, सरी व बेड पाडण्यासाठी एकरी 2 हजार रुपये, 3 हजार लागवड, किटकनाशक फवारणी 7000 निंदनी 9000, एकरी खर्च 1 लाख रुपयांच्या जवळ आला आहे. एक एकरामध्ये आद्रकीचे उत्पादन 80 ते 100 क्विंटल निघत असून 800 रूपये भावाप्रमाणे आद्रकीची विक्री सुरु असून शेतकऱ्यांना 50 हजार ते 60 हजार रूपये तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याची शासनाने गंभीर दखल घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.