औरंगाबाद- शहरातील किरकोळ विक्रेत्यांना छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करण्यासाठी बायजीपुरा येथे घरात दडवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
बायजीपुरा भागातील गल्ली नंबर ७ येथे राहत असलेल्या नजीर शेख रशीद शेख याने स्वतःच्या घरात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांना मिळाली होती. यामाहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सरेश अजिंठेकर यांच्या मदतीने शेख याच्या घरी छापा मारण्यात आला.
या छाप्यात नजीर शेख रशीद शेख याच्या राहत्या घरी 86000 रुपयांचा गुटखा मिळून आला आहे. अवैधरित्या गुटख्याचा साठा करणाऱ्या नजीर शेख रशीद शेख यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी दिली आहे.