छत्रपती संभाजीनगर Ganesh Festival In Canada : अजिंठा वेरुळ लेणीचं आकर्षण सातासमुद्रापार केव्हाच पोहचलं आहे. त्याचाच प्रत्यय यंदाच्या गणेश उत्सवात पाहायला मिळाला. कॅनडा इथं राहणाऱ्या अभियंता असलेल्या तरुणानं बाप्पाच्या देखाव्यात वेरुळ लेणी ( Ellora Cave ) परिसरातील खास आकर्षण असलेलं कैलास लेणीचं शिल्प साकारलं आहे. हा देखावा पाहणारा प्रत्येक जण शहरात येण्याची मनिषा बोलून दाखवत आहे. अभिषेक फाटक आणि स्नेहल फाटक यांनी हा देखावा सादर केला असून गेल्या तीन वर्षांपासून भारताचं वैभव दाखवण्याचा हे दाम्पत्य प्रयत्न करत आहेत.
चार महिन्यात साकारली लेणीची प्रतिकृती : आधी कळस कोरल्यानंतर मग पाया कोरल्याची अख्यायिका कैलास मंदिराची आहे. वेरूळच्या कैलास लेणीची हुबेहुब प्रतिकृती अभिषेक आणि स्नेहल फाटक यांनी कॅनडातील बाप्पासमोर साकारली आहे. वेरुळ इथं हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माच्या 34 लेण्या आहेत. यात 16 क्रमांकाची लेणी कैलास लेणी आहे. ती 8 व्या शतकात राष्ट्रकूट राजवटीत कोरण्यात आली. आधी कळस कोरल्यानंतर मग पाया अशा पद्धतीनं अखंड दगडात कोरलेलं हे जगातील सर्वात मोठं शिल्प आहे. हे महत्त्व जगाला पटवून देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून केला गेला. मूळ इंदूरचे रहिवासी आणि 2 वर्षांपासून कॅनडातील ब्रैम्पटन इथं राहात असणारे अभिषेक एका आयटी कंपनीत मॅनेजर पदावर तर स्नेहल मार्केटिंग कोऑर्डीनेटर म्हणून कार्यरत आहेत. यंदाच्या गणेश उत्सवात त्यांनी देखावा सादर करताना तब्बल चार महिने अथक परिश्रम घेतले. देखावा तयार करण्याच्या कामाला जूनमध्ये सुरुवात केली. गुगलवर व्हिडिओ, फोटो बघितले. लेखातून त्याचं वैशिष्ट, डायमेन्शन्स, बारकावे जाणून घेतले. कागदावर डिझाईन तयार केलं. ऑनलाईन शॉपींगच्या खोक्याचे, कार्डबोर्डचे, टीव्हीच्या खोक्यातील थर्माकॉल आणि टिश्यु पेपरचा वापर करुन देखावा साकारला. त्याला तब्बल 200 तास लागल्याची माहिती फाटक कुटुंबियांनी दिली.
देखावा पाहण्यासाठी येत आहेत नागरिक : गणेश उत्सवात आपल्या लोकांच्या भेटी गाठी होतात, त्यात विचारांची देवाणघेवाण यानिमित्तानं होते. याचाच आधार घेत भारतातील अनेक वास्तूंची जगाला माहिती व्हावी, हे वैभव जगासमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 2021 मध्ये त्यांनी पुण्यातील टिळकवाडा तर 2022 मध्ये महेश्वर इथल्या नर्मदा घाटाचा देखावा साकारला होता. भारतात आल्यावर त्यांनी वेरूळला भेट दिली होती. तेव्हापासून ही लेणी मनात घर करून होती. मात्र, जागतिक वारसा असतानाही कॅनडात त्याची फार माहिती नसल्याचं जाणवलं. यामुळेच हा देखावा तयार करण्याचं ठरविलं. गणेश उत्सवाला सुरुवात झाल्यावर उभारलेला देखावा पाहण्यासाठी मित्र परिवारानं घरी भेट दिली. तर कॅनडामधील नागरिक देखील देखावा पाहण्यासाठी येत असून त्यांनी भारतात येऊन लेणी पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती फाटक दाम्पत्यानं ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला दिली आहे.
हेही वाचा :