छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ganesh Festival 2023 : गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते आरती करत बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते आरती करून मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी मंत्री अतुल सावे, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मंदिर विश्वस्त हजर होते. यंदा असलेल्या दुष्काळाची परिस्थिती जाऊ दे, अशी मनोकामना केल्याची माहिती उपस्थित नेत्यांनी दिली.
ग्रामदैवत पूजनाने सोहळ्याला सुरुवात : राजा बाजार भागात काळ्या पाषाणात स्वयंभू गणेशाची मूर्ती आढळून आली होती. त्यांनाच 'संस्थान गणेश' असे नाव देण्यात आले. त्या मूर्तीला शेंदूर लावून त्याचे पूजन करण्यात येऊ लागले. भक्ती भावाने पूजन करणाऱ्या भक्तांचे नवस पूर्ण झाले, असे सांगण्यात आले. त्यामुळे संस्थान गणपतीची ख्याती जिल्ह्याबाहेर गेली. आसपासच्या जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी नित्याने येतात. इतकंच काय तर राजकीय मंडळी देखील त्यांची सभा असो की, मिरवणूक सर्वांत आधी संस्थान गणपती समोर नतमस्तक होतात आणि कार्याला शुभारंभ करतात. यावर्षी देखील आराध्य दैवताच्या पूजनाने सोहळ्याला सुरुवात झाली.
नेहमीसारखी राजकारण्यांची चर्चा रंगली : दरवर्षी पूजन सुरू असताना राजकीय पक्षांची शेरेबाजी चांगलीच चर्चेत राहाते. यावर्षी देखील त्याचाच प्रत्यय आला. बाप्पाचे पूजन झाल्यावर सर्व नेत्यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अबोला धरत शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांच्याशी बोलणे टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. त्यावर बोलताना खैरे यांनी मी कडवट शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा एकनिष्ठ आहे असं उत्तर दिलं. तर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका करणे टाळले. धार्मिक कार्यक्रमात एकत्र येत असतो, इथे राजकारण करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दुष्काळाचे सावट जाऊ दे : संस्थान गणपतीचे पूजन झाल्यावर यंदाची दुष्काळाची परिस्थिती दूर होऊ दे, शेतकऱ्यांना बळ देऊन त्यांच्या पाठीशी उभा राहा, अशी मनोकामना पालकमंत्री संदीपान भुमरे, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा:
- Ganesh Chaturthi २०२३ : नवसाला पावणारा 'टेकडीचा गणपती'; सचिन तेंडुलकर देतो अवश्य भेट, जाणून घ्या इतिहास
- Solapur Ganeshotsav: मानाचा आजोबा गणपती १३८ वर्षांचा; टिळकांनी घेतली होती ‘आजोबा गणपती’ची प्रेरणा
- Ganeshotsav 2023 : ‘गणपती माझा नाचत आला'; मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीचा जल्लोष...पाहा व्हिडिओ