वैजापूर (औरंगाबाद) - किरोकोळ जुन्या भांडणाच्या कारणावरू दोन गटांमध्ये लोखंडी राॅडसह चाकूने हाणामारी झाल्याची घटना वीस एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास शहरातील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत एकजण गंभीर तर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकावर चाकू व राॅडने हल्ला केल्यामुळे त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
फ्रीस्टाईल हाणामारी - दिनेश शिंदे (वय 24 रा. रोटेगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रोटेगाव येथील संतोष बंगाळ व अक्षय बंगाळ या दोघांचा गावातीलच दिनेश शिंदे याच्याशी गुढीपाडव्याच्या दिवशी वाद झाला होता. परंतु नंतर दरम्यान वीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास संतोष बंगाळ व अक्षय बंगाळ या दोघांनी दिनेश शिंदे याला फोन करून शहरातील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात बोलावून घेतले. दिनेश शिंदे याच्यासोबत त्याचा अन्य एक सहकारीही होता. तेथे या चौघांमध्ये चाकूसह दगड, लाथाबुक्यांनी व लोखंडी राॅडने फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यात दिनेश शिंदे याच्या कानामागे चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तत्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याला जास्त दुखापत झाली असल्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तसेच संतोष व अक्षय बंगाळ हे दोघेही किरकोळ जखमी झाले असून या दोघांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
व्हाट्सप ठरले वाद वाढण्याचे कारण? - वाद होण्याचे मुख्य कारण काहीही असले तरी मात्र ह्या वादाला गती देण्याचे काम व्हाट्सप स्टेस्ट वरून सुरू झाले आहे. दोन्हीही गटातील व्यक्ती एकमेकांना मारण्याची अप्रत्यक्ष धमकी देत होते, त्यातून सुरू झालेला वाद थेट गंभीर व तुंबळ हाणामारी प्रयत्न येऊन थांबला.