औरंगाबाद - कुटुंबासह मुंबईला गेलेल्या सिडको, एन-४ मधील डॉक्टरचे घर फोडून चोरांनी ७८ तोळे सोने आणि चार लाख ७९ हजार पाचशे रुपयांची रोकड लांबवली होती. ही घटना ३० डिसेंबर २०१९ रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी सराफा व्यापा-यासह तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेले सोन्याचे ३९९.२९ ग्रॅम सोने आणि बँक खाते गोठवून हस्तगत केलेले सहा लाख ५९ हजार ३९३ रुपये डॉक्टर कुटुंबाला पोलिसांनी परत केले.
या बाबत अधिक माहिती अशी की, मुळचे लातूरच्या अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील सेवानिवृत्त शल्यचिकित्सक डॉ. नामदेव कलवले (६७, रा. एफ-१, बी-सेक्टर, एन-४, सिडको) हे कुटुंबियांसह २८ डिसेंबर रोजी कार्यक्रमानिमित्त मुंबईला गेले होते. त्यानंतर चोरांनी त्यांच्या बंगल्यात शिरुन दरवाजाचे कुलूप तोडून ७८ तोळ्याचे सोने आणि चार लाख ७९ हजार पाचशे रुपयांची रोकड लांबवली होती. ३० डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार मोलकरणीच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर तिने डॉ. कलवले यांच्यासह पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहका-यांनी धाव घेऊन पाहणी केली होती.
ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने पाहणी केल्यानंतर परिसरातील सीसी टिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी एका संशयिताने वॉल कंपाऊंडवरुन उड्या घेत डॉ. कलवले यांच्या घरात शिरकाव केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी वर्णनावरुन त्याचा शोध घेतला होता. त्यावरुन कुख्यात घरफोड्या सय्यद सिकंदर व त्याचा साथीदार शंकर तानाजी जाधव यांना १९ जानेवारीला पकडण्यात आले होते. त्यांनी जालन्यातील सराफा व्यापारी अनिल शेळके याला दागिन्यांची विक्री केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे पोलिसांनी सराफा व्यापारी अनिल शेळके याला ताब्यात घेऊन ३९९.२९ ग्रॅमची लगड त्याच्याकडून जप्त केली होती. तर सिकंदरने त्याची मैत्रिण रेश्मा निसार शेख हिच्या बँक खात्यात सहा लाख ५९ हजार रुपये जमा केले होते. पोलिसांनी रेश्माचे खाते गोठवत त्यातून संपुर्ण रक्कम हस्तगत केली होती.
दरम्यान, आज गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, जमादार नारायण लोणे, एम. सी. घुसिंगे व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. कलवले व त्यांच्या पत्नी चंद्रभागा यांना दागिने आणि रोकड परत करण्यात आली.