औरंगाबाद- दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथील तबलिग-ए-मर्कझमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या 47 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यापैकी 40 जणांची तपासणी करण्यात आली असून 7 जणांना घाटी रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तबलिग-ए-मर्कझमध्ये गेलेल्या अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर सरकारने या धार्मिक संमेलनाला गेलेल्या लोकांचा शोध सुरू केला होता.
तबलिग-ए-मर्कमझमध्ये गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आले असून आतापर्यंत ४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी गांधीनगर भागातील 7 जणांना क्रांतीचौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असून. अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या सात पैकी सहाजण लग्नाला गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. या मरकझमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने तेथे सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मर्कझमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून ते लोक वेगवेगळ्या राज्यातील शहरांमध्ये गेले आहेत. त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, अशी भिती निर्माण झाल्याने वेगवेगळ्या शहरात परतलेल्या आणि मर्कझमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून शोधमोहीम हाती घेतली असता यापूर्वीच ४० जणांची तपासणी केल्याचे समोर आले असून अनेकांना घरीच विलगीकरण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.