औरंगाबाद - शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून औद्योगीक वसाहतीमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बजाज कंपनीतील अनेक कामगारांना कोरोनाची लागण झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत कंपनी सुरू ठेवणे धोक्याचे असल्याने कंपनी तातडीने बंद करा, अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली. यासाठी त्यांनी बजाज कंपनीसमोर आज धरणे आंदोलन केले.
बजाज कंपनीत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन कामगारांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. मात्र, तरिही कंपनी प्रशासनाने कामकाज सुरुच ठेवले आहे. यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढला आहे. म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी काळे कपडे आणि डोक्याला काळी पट्टी बांधून बजाज कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद जिल्ह्यात वाळूंज सध्या हॉटस्पॉट ठरत आहे. येथील औद्योगीक वसाहतीतील अनेक उद्योगांची थांबलेली धडधड पुन्हा सुरू झाली आहे. बजाज कंपनीने देखील स्थानिक कामगारांना कामावर रुजू करून घेत आपला कारखाना सुरू केला. त्यानंतर अचानक कंपनीत काम करणाऱ्या मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कंपनीत अवघ्या काही दिवसांमध्ये पन्नासहून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. त्यानंतर बजाज कंपनीने दोन दिवस काम बंद ठेवले व पुन्हा काम सुरू केले. मात्र, याठिकाणी अजूनही रूग्ण आढळत असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. कंपनीत काम करणे धोक्याचे असताना कंपनी सुरू ठेवणे चुकीचे आहे. कंपनी आणि औद्योगिक वसाहतीतील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली.