औरंगाबाद - माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. अनेक लोकांच्या विरोधात जाऊन त्यांनी जायकवाडी धरणाची निर्मिती केली आणि त्यांच्यामुळे उभे राहिलेल्या जायकवाडी धरणामुळे काही जिल्ह्यात हरित क्रांती झाली, असे मत राजकीय अभ्यासक आणि जेष्ठ पत्रकार प्रमोद माने यांनी व्यक्त केले.
राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा, अशा केंद्र तसेच राज्यातील चारही सभागृहांचे सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण तब्बल ५० वर्ष राजकारणात सक्रीय होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या गृहमंत्रिपदार्यंत थेट मजल मारली. मराठवाड्याचे भाग्यविधाते, भगीरथ, अशी बिरुदावली मिळवली. त्यांना मराठवाड्यातील जनता दैवत मानत होती. कोणालाही हेवा वाटावा, अशीच त्यांची राजकीय कारकिर्द होती. शंकरराव चव्हाण यांच्या आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने वेगवेगळ्या मान्यवरांशी संवाद साधत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी माने म्हणाले, जायकवाडी प्रकल्प आधी माजलगाव जायकेकीवाडी या गावाजवळ होणार होते. मात्र, भौगोलिक दृष्ट्या पैठण येथे धरण तयार करणे सोयीचे होते. मात्र, यावेळी धरण तयार करण्यासाठी प्रचंड विरोध झाला होता. मात्र, चव्हा यांची एक शैली होती. ते विपरित परिस्थितीतही आधी विरोधकांना बोलावून त्यांची समजूत काढायचे. त्यानंतरही जर विरोध कायम राहिलाच तर सर्वांच्या विरोधात जाऊन विकास कामे करायचे. त्यांनी त्यांची हीच शैली वापरली आणि मोठा विरोध पत्करून जायकवाडी धरणाची निर्मिती झाली.
जायकवाडी धरणे हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरणे ठरले, यामुळे जायकवाडी धरणामुळे मराठवाड्यासह राज्याला वेगळी ओळख मिळाली. जायकवाडी धरण तयार करताना त्यांची साठवण क्षमता, पाण्याचे येणारे स्रोत तपासल्यानंतर पैठण येथे हे धरण उभारणे योग्य असल्याचे दिसून आले. कारण, पैठणमधून जाणारी गोदावरी नदी वाहत होती. त्याचबरोबर काही अंतरावर अहमदनगर आणि नाशिक धरणांमधून येणाऱ्या पाण्याचा संगम होत असल्याने दोन्ही बाजूने मोठया प्रमाणात पाणी धरणात येऊ शकत होते. तसेच पैठणपासून तर कायगावपर्यंतची पाण्याची साठवण होणे शक्य होते. मात्र, मोठ्या प्रमाणात शेती धरणात जात असल्याने अनेकांचा मोठा विरोध धरणासाठी दिसून आला. मात्र, काही लोकांची समजूत काढून तर काही जणांच्या विरोधात जाऊन शंकरराव चव्हाण यांनी धरण तयार करायचा निश्चय केला आणि 103 टीएमसी पाणी क्षमता असलेले सर्वात मोठे धरण तयार केले.
आज 50 वर्षांनी या धरणाला विरोध करणाऱ्यांना निश्चितच विरोध केल्याबद्दल वाईट वाटत असेल, असे मतही ज्येष्ठ पत्रकार माने यांनी व्यक्त केले. जायकवाडी धरणामुळे औरंगाबाद शहराला मोठे महत्त्व आले. धरणाचे पाणी मिळाल्याने आसपासच्या परिसरासह नांदेडपर्यंत गोदावरी नदीच्या काठावरील गावांच्या शेतीला मोठा फायदा झाला. त्याचबरोबर औरंगाबाद शहरासह औद्योगिक वसाहत निर्माण झाली लाखो लोकांना रोजगार मिळाला. कालांतराने जालना जिल्ह्याला पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वसाहतीला पाणी मिळाले. त्यामुळे या धरणाचे पाणी मिळाल्याने मराठवाड्यात मोठी क्रांती झाली, असे राजकीय अभ्यासक प्रमोद माने 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना म्हणाले.