पैठण (औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील थेरगाव येथे आज (रविवार) मक्याच्या शेतात बिबट्या दडून बसला होता. सदर शेत मालकाच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या शेतातील लोकांना ही माहिती दिली. यानंतर औरंगाबाद वन विभागाला याची माहिती देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांच्यांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात आले. तसेच या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ड्रोन कॅमेराची देखील मदत घेतली होती.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम
पैठण तालुक्यातील थेरगाव येथे आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास एका शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, औरंगाबादहुन वन खात्याचे अधिकारी त्यांच्या पथकासह सदर परिसरात त्वरित दाखल झाले. तसेच पाचोड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी देखील थेरगावात दाखल झाले. यावेळी ड्रोन कॅमेराच्या मदतीने बिबट्याचा तपास लावल्यानंतर अतिशय थरारक पद्धतीने बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले.