छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): वुमन्स 20 परिषद गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल रामा मध्ये होत आहे. यासाठी वेगवेगळ्या वीस देशांच्या महिला शहरात दाखल झाल्या. सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात करण्यात आली. महिला संबंधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र पहिल्या दिवशी झाले. मंगळवारी सकाळी आलेले विदेशी पाहुणे बीबीचा मकबरा पाहण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी पारंपारिक पद्धतीने फुले उधळत, गुलाब पुष्प हातात देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मकबरा परिसरात येतात आलेल्या विदेशी पाहुण्यांनी वास्तू पाहून आश्चर्य व्यक्त केले. अनेकांना फोटो काढण्याचा तर काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बीबीका मकाबऱ्याबाबत माहिती दिली. त्यावेळी एवढे छान पर्यटन स्थळ आत्तापर्यंत पाहिले नाही असे उद्गार विदेशी पाहुण्यांनी काढले.
औरंगाबाद लेनीची केली पाहणी: वुमन्स 20 परिषदेसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी सकाळी सहा वाजेपासून शहराचा फेरफटका मारायला सुरुवात केली. सर्वात आधी औरंगाबाद लेणीच्या डोंगरावरून त्यांनी उगवत्या सूर्याचा मनमोहक दृश्य टिपले. त्यानंतर औरंगाबाद लेणी परिसरात त्यांनी भेट दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्यांबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. आजपर्यंत अशा पद्धतीच्या कलाविष्कार आपण अनुभवला नाही, असे यावेळी विदेशी पाहुण्यांनी सांगितले.
ऐनवेळी बदलला मार्ग: जी ट्वेंटी परिषदेसाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांना सकाळपासून शहरातील विविध भागांच्या भेटी देण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले. त्यानुसार दिल्ली गेट पासून सकाळी सहा वाजता हा दौरा चालू होणार होता. दिल्ली गेट, रंगीन दरवाजा मार्गे औरंगाबाद लेणी असा हा मार्ग ठरवण्यात आला होता. मात्र ऐनवेळी या मार्गात बदल करून, पाहुण्यांना थेट औरंगाबाद लेणी परिसरात नेण्यात आले. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, मात्र शहर आणि येथील व्यवस्था पाहून आलेल्या पाहुण्यांनी औरंगाबादचे आभार मानले.
परिषदेसाठी रोषणाईने उजळले शहर: जी-20 आणि वूमन-20 परिषदेनिमित्त विमानतळावर विविध प्रकारची सजावट करण्यात आली होती. संपूर्ण शहर लग्नघराप्रमाणे नटले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या जी 20 बैठकीसाठी संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आले होते. रस्त्यांना रंगरंगोटी करण्यात आली होते. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात आला होता. औरंगाबाद शहरातील रस्त्यांचे काम आणि सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर पुर्ण केली होती. तसेच रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांची दुरुस्ती व रंगरंगोटी, रस्त्यालगतच्या भिंती व पुलांची रंगरंगोटी, पथदिवे बसवणे, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती, वाहतूक नियोजन अशी कामे केली होती.