औरंगाबाद - सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करणाऱ्या एकूण पाच जणांना अटक झाली आहे. पोलिसांनी खोकडपुरा परिसरातील गजानन अभ्यासिकेवर देखील छापा मारून तेथून साहित्य जप्त केले. आरोपींनी काही हायटेक उपकरणे मागवली होती, या उपकरणांचा वापर परीक्षेसाठी करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
धनश्री महाविद्यालयात दोघांना अटक -
आरोग्य खात्याच्या विविध १९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. शहराजवळील गेवराई तांडा येथील धनश्री महाविद्यालयात सकाळी दहा वाजता आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या चौघांची केंद्रावरील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्र व अन्य साहित्य सापडले. त्याआधारे परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी मदत केली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी केंद्रात छापा मारून परीक्षार्थी मदन धरमसिंग बहुरे (वय २६) व केंद्राबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या भावाला अटक केली.
अभ्यासिकेतून चालायचे रॅकेट -
खोकडपुरातील गजानन अभ्यासिका येथून आम्हाला उत्तरे पुरवली जात असल्याची माहिती बहुरे बंधूनी दिली. उपनिरीक्षक शोभा क्षीरसागर, अश्विनी कुंभार, शिपाई तनुजा गोपाळघरे, संतोष टिमकीकर आणि अनिल चव्हाण यांनी खोकडपुन्यातील अभ्यासिकेवर छापा मारला. पोलीस आल्याचे कळताच तेथून ६ ते ७ जण पळून गेले. बेग गुलाब बेग (३०, रा. किन्होळा, ता. बदनापूर, जि. जालना) हा पोलिसांच्या हाती लागली. या अभ्यासिकेच्या तीन खोल्यांमधून पोलिसांनी संशयित साहित्य जप्त करण्यात आले आहे.