औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेडने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली केली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पहिली यादी जाहीर करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले.
समविचारी राजकीय पक्षांनी सोबत घेण्यास तयारी दाखवल्यास पुढची भूमिका घेवू. विधानसभेच्या किमान 100 जागा संभाजी ब्रिगेड लढवेल, अशी माहिती भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक बांधणी केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. कोणी सोबत घेतले तर सोबत अन्यथा स्वबळावर अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. इतकी वर्षे दुसऱ्यांसाठी काम केले. मात्र, आता संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवेल. सत्ताधारी किंवा विरोधक ज्यांना आमच्या मागण्या मान्य असतील, त्या पक्षासोबत आम्ही जावू असे सांगत पहिल्या 15 उमेदवारांची यादी संभाजी ब्रिगेडने जाहीर केली.
पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे :
माणिकराव पावडे - कारंजा जि. वाशिम आशिष खंडागळे - आर्वी जि. वर्धा
राजू उर्फ नितीन वानखेडे - देवळी जि. वर्धा
दिलीप मडावी - गडचिरोली
जगदीश पिलारे - ब्रम्हपुरी जि. गडचिरोली
अरुण कापडे - वरोरा जि. चंद्रपूर
भगवान कदम - भोकर, जि. नांदेड
धनंजय सूर्यवंशी - नांदेड उत्तर
बालाजी शिंदे - जिंतूर जि. परभणी
टिळक भोस - श्रीगोंदा, जि. अहमदनगर
डॉ. संदीप तांबोरे - उस्मानाबाद
दिनेश जगदाळे - माढा, जि. सोलापूर
सोमनाथ राऊत - सोलापूर उत्तर
किरण घाडगे - पंढरपूर जि. सोलापूर
ऋतुराज पवार - तासगाव कवठेमहांकाळ जि. सांगली
दरम्यान, निवडणूक लढवताना कोणी सोबत आले तर त्यानुसार दुसरी यादी जाहीर करू असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले.