औरंगाबाद - सध्या राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र हे निर्बंध मोडून बँडबाजा लावून लग्न करणाऱ्या नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
बँड बाजा लावून मिरवणूक
जिल्ह्यातील गारखेडा परिसरातील भारत नगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर कान्होबा जाधव यांचे लग्न जालना जिल्ह्यातल्या हसनाबाद येथील तरुणीशी ठरले होते. शुक्रवार (९) रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र परवानगी नसताना जाधव कुटुंबीयांनी बँड बाजा लावून मिरवणूक काढली. यावेळी वऱ्हाडी मंडळीची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
कोरोनाचे निर्बंध लागू असताना अशा प्रकारे विवाह सोहळा पार पडत असल्याची माहिती पुंडलिकनर पोलीस ठाण्यास मिळाली. त्यावर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पीएसआय प्रभाकर सोनवणे व इतर कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र यावेळी अचानकपणे पोलीस आलेले पाहुन वऱ्हाडी मंडळीमध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यातूनही विवाह सोहळा वेळेवर पार पाडवा यासाठी नवरदेवसह मोजक्या लोकांना लग्न लावणेसाठी हसनाबादकडे पाठविण्यात आले.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींसह लग्न कार्यास परवानगी असताना नियम डावलून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी वरपिता कान्होबा जाधव, क्रुझर चालक बापु रावसाहेब मते, रवींद्र मुरलीधर मिसाळ यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग म्हणून गुन्हा दाखल केला आहे.