औरंगाबाद - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र काहीजण संचारबंदीतही लग्न उरकून घेत आहेत. अशीच घटना पैठण तालुक्यात घडली असून बालिकेचा विवाह लावल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर भानुदास कोल्हे, अनिता ज्ञानेश्वर कोल्हे, मंदाबाई गणपत देशमुख, गणपत धोंडीबा देशमुख, साईनाथ गणपत देशमुख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की ज्ञानेश्वर कोल्हे यांच्या १५ वर्षाच्या बालिकेचे साईनाथ गणपत देशमुख याच्यासोबत ज्ञानेश्वर कोल्हे यांच्या राहत्या घरात चोरुन लग्न लावल्याची तक्रार पाचोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी ज्ञानेश्वर भानुदास कोल्हे, अनिता ज्ञानेश्वर कोल्हे ( दोन्ही राहणार खातगाव तालुका पैठण) तर मंदाबाई गणपत देशमुख, गणपत धोंडीबा देशमुख, साईनाथ गणपत देशमुख ( दरेगाव तालुका पैठण ) यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक भामरे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार नाईक नुसरत शेख, नाईक गोरखनाथ कणसे हे करत असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.