औरंगाबाद - येथील कन्नड तालुक्यातील गुदमातांडा येथील एका पंधरा वर्षीय तरुणाचा दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कौतिक नारायण राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- 'आम्ही नवरदेव असून ज्या नवरीशी लग्न कर म्हणेल त्याच नवरीशी करणार'
गुदमातांडा येथील रहिवासी नारायण फत्तू राठोड यांनी याची तक्रार दिली होती. ७ नोव्हेंबर रोजी कौतिक नारायण राठोड (वय १५) घरी आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवरातील गायरान तळ्याजवळ कौतिकचा मृतदेह आढळला. नातेवाईक व गावच्या पोलीस पाटील यांनी याची पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी येवून पंचनामा केला.
मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सुबाराम जाधव व मोतीराम सुबाराम जाधव यांच्याशी कौतिकची चांगली मैत्री होती. ते सोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगलात जात होते. घटनेच्या दिवशी पण हे सोबत होते. घटना उघड झाल्यावर घाईगडबीत कौतिकचे मित्र मोटारसायकल वरून जात असल्याचे राठोड यांच्या एका नातेवाइकांने बघितले. त्यांना विचारले असता सासुरवाडीला चाललो, असे त्यांनी सांगितले. या संशयामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.