औरंगाबाद - वृद्धाश्रमात राहणारी म्हाताऱ्या आईने जगाचा निरोप घेतला. ही बातमी मुलाला देण्यात आली. मात्र, त्याने त्याच्या आईचा मृतदेह नेण्यास नकार दिला. मात्र, रक्ताच्या नाही तर मनाने आई मानणारा माणुसकी ग्रुप अंत्यविधीसाठी पुढे सरसावला.
शशिकला पवार यांचे झाले निधन -
मृत महिलेचे नाव शशिकलाबाई पवार असे आहे. बुधवार दि. 16 जूनला वयाच्या 75व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ही माहिती त्यांच्या परिवाराला देण्यात आली. मात्र, तिकडून कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यानंतर अनाथ आश्रमातील ज्योती दनके यांनी माणुसकी ग्रुपच्या सुमित पंडित यांना अत्यसंस्कार करण्याबाबत मदत मागितली. त्यांच्या विनंतीला माणुसकी समुहाच्या सभासदांनी मदतीचे हात पुढे केले आणि अंत्यविधी करण्यासाठी मदतकार्य केले. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हिंदु धर्माच्या परंपरेप्रमाणे हा अंत्यविधी पार पडला. विशेष म्हजजे अनाथ आश्रमातील ज्योती दनके यांनीही मृत शशिकला पवार यांच्या मृतदेहाला खांदा दिला.
हेही वाचा - यमराजाच्या हातून काढून घेतला आईने काळजाचा तुकडा, डॉक्टरांनी केले होते मृत घोषित
पतीसह राहत होत्या वृद्धाश्रमात -
गेल्या 4 वर्षांपासून शशिकला पवार आणि त्यांचे पती चुनीलाल पवार हे वृद्ध दाम्पत्य चिंचपूर वेणुताई वृध्दाश्रमातील साहेबराव दनके यांच्याकडे राहत होते. मागील वर्षी शशिकला यांचे पती चुनीलाल यांचे निधन झाले होते. त्यानंतर शशिकला यांना पक्षाघात झाला होता. मात्र, रक्ताच्या नेत्यांनीच नाकारल्यावर, त्या आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दनके यांच्याकडे राहत होत्या. बुधवारी अचानक तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले.
माणुसकी आली धावून -
अंत्यसंस्कार करण्यासाठी शीवप्रभा चारेटेबल ट्रस्ट, सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, अनिल लुनिया, परशरामजी नरावडे, बद्रीनाथ भालगडे, सुमित पंडित, प्रशांत दद्दे, बाळासाहेब राठोड, जगन शिरसाट, किशोर माने, गोकुळ खटावकर, जितेंद्र निंबाळकर, संतोष शळके, चद्रकांत गीते, निलेश चौथे, दगडु, कचरु सुरडकर, संदीप पाठक, दनके, कृष्णा दनके, एकनाथ आगाम, सागर दनके, परमेश्वर दनके, कृष्णा उमक, माणुसकी समुहाचे सर्व सभासद मदतीसाठी धावले.
हेही वाचा - Tragic Deaths... हातावर मेहंदी लागण्याआधीच कोरोनाने केला घात, आईनंतर अवघ्या १० दिवसांत मुलीचंही निधन
त्यांना दुःख देण्याचा आमचा काय अधिकार -
ज्या आई-वडिलांनी आम्हाला लहानाचे मोठे केले स्वतःचे दुःख सहन करून आम्हाला सुखाची सावली दिली, असे असताना जेव्हा आई-वडिलांना एकटे सोडून देणे, ही माणुसकी नाही. समाजातील कोणत्याही आई-वडिलांना त्रास न देता त्यांची सेवा केली पाहिजे. ज्यांच्यामुळे आम्ही जग पाहिले, त्यांना दुःख देण्याचा आमचा कोणताही अधिकार नाही, असे मत माणुसकी ग्रुपचे सुमित पंडित यांनी व्यक्त केले.