औरंगाबाद - प्रशासन पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेत नसल्याने पैठण येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपेगाव - हिरडपुरी बंधाऱ्यात अर्धा टीएमसी पाणी बंधाऱ्यात सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या पायथ्याशी आंदोलन सुरू केले होते. मात्र, प्रशासन निर्णय घेत नसल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी औरंगाबादेत पुढचे आंदोलन सुरू केले.
आंदोलन करणारे शेतकरी ३ दिवस जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी बसून होते. बुधवारी (१५ मे) पैठण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले. मात्र, प्रशासन याबाबत निर्णय घेण्यास विलंब करत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. त्यामुळे गुरुवारी (१६ मे) दुपारी औरंगाबादच्या गोदावरी पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयात या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.