औरंगाबाद - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान प्रति हेक्टरी ५० हजार द्यावे यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या हिंदवी जंनक्रांती सेनेच्या वतीने वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील बसस्थानकावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आले आहे.
उद्या (२९ मे) रोजी हिंदवी जंनक्रांती सेनेच्या वतीने वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील बसस्थानकावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात १०७ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. सहभागी होणाऱ्या १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास सहमती दर्शविणारे पत्र उपविभागीय कार्यालयास दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास सामूहिकरीत्या सर्व शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते बस स्थानकासमोर विष पिऊन जीवन संपविणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर अनेक वेळा आंदोलने, निदर्शने, रास्तारोको, मोर्चे काढण्यात आले आहेत. मात्र, प्रशासन आणि राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर दिसत नाहीत. यामुळे हा टोकाचा निर्णय आम्ही घेत आहोत, अशी प्रतिक्रिया साळुंके यांनी दिली आहे.