औरंगाबाद - ट्रॅक्टरच्या थकीत हफ्त्यासाठी फायनान्स कंपनीने तगादा लावल्याने एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना देवगावरंगारी भागात घडली. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. भगवान तुळशीराम कुशेर (वय 60, रा. देभेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत कुशेर यांच्या मुलाने फायनान्सवर ट्रॅक्टर घेतले होते. त्याचे काही हफ्ते बाकी असल्याने फायनान्स कंपनीकडून हफ्ते भरण्यासाठी मुलाच्या मोबाईलवर वारंवार कॉल येत होते. ही बाब मृत भगवान यांना कळाली होती. ट्रॅक्टर घेऊन गेले, तर परिवाराची उपजिविका कशी भागेल, अशी चिंता त्यांना लागून होती. याबाबत ते वारंवार घरच्यांना बोलून दाखवत होते. त्यांना घरच्यांनी समजून सांगत सर्व काही नीट होईल, असा धीर दिला. मात्र त्यानंतरही वारंवार फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून हाफ्त्याबाबत तगादा सुरूच होता. यामुळे भगवान यांनी काही दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा- बहीण रागावली म्हणून 14 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
भगवान यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी फायनान्स कंपनीच्या तगाद्या मुळेच भगवान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल होणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पोलीस नातेवाईकांची समजूत काढत आहेत.
हेही वाचा- ...म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आलो नाही; इम्तियाज जलील यांचे स्पष्टीकरण