कन्नड(औरंगाबाद)- कन्नड तालुक्यातील आडगाव येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील चिकूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गोरख नामदेव सुस्ते वय 37 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दुष्काळी परिस्तिथी, पिकविलेल्या शेतमालाला भाव मिळत नव्हता यामुळे सुस्ते यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला होता. बँक, पंतसस्था व हात उसनवारी कर्जाची परतफेड कशी करायची या विचाराने ते चिंतेत असायचे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शेतमालाची अक्षरश: वाट लागल्याने त्यांची चिंता वाढली होती, अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
कर्जाबाजारीपणातून गोरख सुस्ते यांनी शेतातील चिकूच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. पोलीस पाटील रामेश्वर वाघ यांनी पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. बीट जमादार अरुण गाडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक य. न. अंतरप, अरुण गाडेकर, शिवदास बोर्डे करीत आहे.