औरंगाबाद - आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोदावरीच्या पात्रात भजन करत 'जागर पाण्याचा' आंदोलन केले. 6 मे पासून अन्नदाता शेतकरी संघटनेच्यावतीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात येत आहेत. 8 दिवसांपूर्वी आंदोलनादरम्यान औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
भीषण दुष्काळ असून अनेक जलाशय कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात अर्धा टीएमसी पाणी सोडण्यासाठी 40 गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी 6 मे पासून आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
तेव्हा शेतकऱ्यांनी गोदावरीच्या कोरड्या नदीपात्रात जागर पाण्याचा आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी नदीपात्रात उतरून भजन कीर्तन करत आंदोलन करत आहेत. प्रशासनाने बुधवारपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही, तर अधिकाऱ्यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.