औरंगाबाद - शहरात पुन्हा तोतया पोलीस सक्रीय झाले आहेत. आज रविवारी पुन्हा एका वृद्ध महिलेला २ भामट्यांनी पोलीस असल्याची थाप मारत लुबाडल्याची घटना घडली. जयश्री रसिकलाल गांधी असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. तुमचे सोने आमच्याकडे द्या ते व्यवस्थित बॅगमध्ये ठेवतो असे म्हणत त्या भामट्यांनी वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेत पोबारा केला. ते काही अंतरावर गेल्यानंतर हा प्रकार महिलेच्या लक्षात आला.
सदर महिला बाजापेठेतुन खरेदीकरून घरी जात असताना गजबजलेल्या औरंगपुरा भागात संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलिस परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करीत आहेत.