औरंगाबाद - पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सोमवारी सायंकाळी नाथ महाराजांच्या बाहेरील मंदिरातून पालखी गोदातिरी आणण्यात आली. पालखीचे आगमन होत असताना भानुदास एकनाथच्या जयघोषातून परिसर दुमदुमला होता.
पैठण ते पंढरपूर असा १९ दिवसांचा आणि परतीचा १२ दिवस असा एकूण ३१ दिवसांचा पायी प्रवास या पालखीचा होतो. मराठवाड्यातील सर्वात मोठी ही पालखी असते. एकनाथ महाराजांचे वंशज रघुनाथ बुआ गोसावी पालखीवाले यांना पालखी नेण्याचा मान मिळतो. एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे ४१९ वे वर्ष आहे. एकनाथ महाराजांच्या पालखीचे सोमवारी सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दुपारी १२ वाजता पैठण येथील गावातील मंदिरातून नाथांच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी नाथांच्या बाहेरच्या मंदिरात पोहचते. त्यानंतर तिथे देखील पादुकांची पूजा करण्यात आली. त्यानंतर महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चारच्या सुमारास पालखीने पालखी ओट्याकडे प्रस्थान केले.
पालखी ओट्यावर नाथांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पैठणकरांनी गर्दी केली होती. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास वाजतगाजत - टाळमृदंगाच्या गजरात, भानुदास एकनाथच्या जयघोषात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. नाथांची पालखी मजल दर मजल करत ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता १९ दिवसांचा प्रवास करून पंढरपुरात दाखल होईल. नाथांची पालखी मानाच्या तीन दिंड्यांमधील तिसऱ्या क्रमांकाची आहे. या पालखीचा मार्ग खडतर आहे. बीड जिल्ह्याच्या गरमाथ्याच्या डोंगरावरून आजही पालखीला दोरखंड बांधून पालखी खांद्यावर घेऊन वारकरी अवघड घाट पार करतात. या सोहळ्यात शासनाच्या सोयी सुविधा कमी पडत असल्याची तक्रार वारकऱ्यांची आहे. इतर पालखीसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा या पालखीला देण्यात याव्यात, अशी मागणी वारकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.