औरंगाबाद - राखी पौर्णिमा आली, की बाजारात अनेक रंगीबेरंगी, विविध प्रकारच्या आकर्षक राख्या महिलांना आकर्षित करतात. आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखी माझीच असावी, असं प्रत्येक बहिणीला वाटतं. मात्र याच राखीच्या माध्यमातून पर्यावरण जपण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या गार्गी भाले यांनी केला आहे.
औरंगाबादच्या देवळाई परिसरात राहणाऱ्या गार्गी भाले या महिलेने करंज नावाच्या झाडाचं बी वापरून राखी तयार केली आहे. राखी बांधून बहीण-भावांतील प्रेम व्यक्त होतं. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच राखीच्या माध्यमातून पर्यावरण जपण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी या बियांचा वापर करण्यात आला.
राखी पौर्णिमा हा बहीण भावाच्या नात्याला जपणारा सण. या सणाला निसर्गाशी असणारं नात जपता यावं याकरिता औरंगाबादच्या गार्गी भाले या प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्यांनी यावर्षी झाडाच्या बियांचा वापर करून राखी तयार केली. त्यासाठी करंज या झाडाच्या बिया त्यांनी निवडल्या. राखी तयार करण्यासाठी अगदी साधी आणि सोपी पद्धत त्यांनी घरीच वापरली. या बियांवर त्यांनी स्वतः नक्षी काम केले. आकर्षक आणि तयार करण्यास अगदी सोपी असलेली ही राखी हाताला बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी पर्यावरणाला जपण्यासाठी वापरता येणार आहे. करंज ही आयुर्वेदात औषधी म्हणून वापरली जाते.
या बियांपासून झाड लावणे अगदी सोपे आहे. यामुळे आपण या बियांची निवड केल्याचं गार्गी यांनी सांगितलं. गार्गी यांनी मागील वर्षी मातीपासून राख्या तयार करून त्यात विविध झाडांच्या बिया वापरल्या होत्या. निसर्गाला वाचवण्यासाठी उचललेल्या या उपक्रमाला परिसरातल्या नागरिकांचीदेखील साथ मिळत आहे.
परिसरातील अनेक महिलांनी गार्गी यांच्याकडून या राख्या बनवून घेतल्या. पर्यावरणाला वाचवण्यासाठी आम्ही या उपक्रमात सहभागी होत असल्याचे परिसरातील महिलांनी सांगितले. सण हा आनंद देणारा असतो मात्र हा आनंद घेत असताना निसर्गालादेखील काही दिले पाहिजे, हे औरंगाबादच्या गार्गी यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे दिसून येत.