औरंगाबाद - सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक सहलीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि बसचालकांनी मद्यधुंद अवस्थेत दिवे आगार येथील समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका स्थानिकाने कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी शिक्षकांसह चालकांना पोलीस ठाण्यात नेऊन समज दिली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यातच अर्धी रात्र काढावी लागली. विद्यार्थिनी घरी परतल्यानंतर संतप्त पालकांनी संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सोयगाव जिल्हा परिषद शाळेची सहल महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळे पाहून 25 डिसेंबरला संध्याकाळी दिवे आगार येथील समुद्रकिनारा पाहण्यासाठी पोहोचली होती. विद्यार्थी समुद्र किनाऱ्यावर असताना मद्यधुंद मुख्याध्यापक आनंद इंगळे, शिक्षक ठाकूर, शिपाई जावळे यांनी मुलींना समुद्राच्या पाण्यात लोटले. त्यानंतर, त्यांनी मुला-मुलींची कुस्ती लावण्याचादेखील प्रयत्न केला. शिक्षकांच्या गैरवर्तवणुकीला घाबरून मुली बसकडे पळाल्या. हा सर्व प्रकार एका स्थानिकाने कॅमेऱ्यात कैद केला.
हेही वाचा - तीस हजारी प्रकरण : महिला अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल
ही बाब स्थानिक पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व मद्यधुंद शिक्षकांसह बसच्या दोन चालकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना तीन-चार तास बसवून नंतर समज देऊन सोडून देण्यात आले. काही अंतरापर्यंत पोलीस विद्यार्थ्यांच्या बसमध्येच बसून होते. घडलेला प्रकार शुक्रवारी सर्व मुला-मुलींनी आपल्या पालकांना सांगितला. शंभरहून अधिक संतप्त पालकांनी शनिवारी (28 डिसेंबर) शाळेत जाऊन शिक्षकांना जाब विचारला. परंतू शिक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत संबंधीतांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मुख्याध्यापक आनंदा इंगळे यांनी केवळ बसचालक दारू पिले होते, असे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थिनींसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.