औरंगाबाद : जवाहर नगर परिसरातील मयूरबन कॉलनी येथील महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार उपनिरीक्षक अनिल बोरडले यांनी परिसरातील काही महिलांची दारूच्या नशेत छेड काढली. महिलांच्या घराच्या भिंतीवर तो बॉल मारून खेळत होता. त्यावेळी तिथे असलेल्या महिलांकडे अश्लील नजरेने पाहून त्यांना त्रास देत होता. काही महिलांनी त्याला अडवल्यावर अश्लील भाषेत त्यांच्याशी वर्तन केले. यानंतर काही महिला एकत्र आल्यावर सर्वच महिलांना त्रास देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जवाहर नगर पोलिसात आपला मोर्चा वळवला, पोलिसावर कारवाई करा, यासाठी रात्री उशिरापर्यंत महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.
उशिरा तक्रार दाखल : पोलीस उपनिरीक्षकाकडून केलेल्या गैरवर्तनानंतर महिलांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी महिलांची तक्रार घेतली, त्यावेळी आरोप असलेले अनिल बोडले तिथे आले. त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकाला व्हिडिओ कॉल करून महिलांना अश्लील भाषेत जाब विचारला, हा पोलिस अधिकारी शुद्धीवर नव्हता, हे त्या समोर आलेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे. जवाहर नगर पोलिसांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र पोलिसांकडूनच गैरवर्तन होत असल्याने सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मागील महिन्यात पोलीस अधिकाऱ्यावर आरोप : 15 जानेवारी रोजी औरंगाबाद पोलीस गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर परिचित महिलाची छेड काढल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री महिलेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना धमकावत गैरवर्तन केल्याचा ठपका ढुमे यांच्यावर ठेवण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस उपनिरीक्षकांने केलेल्या कृत्यामुळे पोलीस रक्षक आहेत की भक्षक? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहकारी महिला पीएसआयवर बलात्कार : नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. ही घटना 15 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. 30 वर्षीय पीडित महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपीने 2019 ते सप्टे 2022 दरम्यान नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणादरम्यान पीडितेबरोबर प्रेम संबंध प्रस्थापित करून तिला बदनामी करण्याची धमकी दिली होती. जबरदस्तीने तिच्यासोबत शारिरीक तसेच अनैसर्गिक संबंध स्थापन केले होते.