औरंगाबाद - बीड महामार्गावर चितेगाव येथील प्रदीप राठोड यांच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री 3,480 लिटर म्हणजे अंदाजे तीन लाखांचे डिझेल चोरीला गेले होते. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. त्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमार्फत आंतरराज्यीय टोळी डिझेल चोरी करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून यात आणखी आरोपी सापडण्याची शक्यता पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वर्तवली.
डिझेल चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली बारा जणांची टोळी गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहे. विशेषतः डिझेल चोरी करत असताना विशेष पद्धतीची कार्यप्रणाली ते राबवत होते. सर्वात आधी सीसीटीव्ही नसलेले पेट्रोल पंप शोधण्याचे काम या टोळीतील काही सदस्य करत होते. त्यानंतर त्या पेट्रोल पंपांवर कशा पद्धतीने काम केले जाते, याची माहिती जमा केली जायची. पेट्रोल पंपावर किती लोक आहेत, पंप कधी बंद होतो, डिझेल टाकी कुठल्या बाजूला आहे, अशा पद्धतीची माहिती टोळीतील लोक जमा करत होते. त्यानुसार मध्यरात्री लांब ट्रक उभा करून, पंपाच्या मागील बाजूने एक पाईप पेट्रोलच्या टाकीपर्यंत आणला जायचा. छोट्या हातपंपाद्वारे त्या पाईपच्या माध्यमातून डिझेल काढले जायचे. दूर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकामध्ये रिकाम्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये ते डिझेल चोरी केले जायचे. त्यानंतर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना ते डिझेल 35 ते 40 रुपये प्रति लिटर या दराने विक्री केली जात असे, यामध्ये दर कमी जास्तही केले जात होते. अशा पद्धतीने ही टोळी चोरलेले डिझेल विकून पैसे कमावत होती.
टोळीने केले मागील वर्षभरात 36 गुन्हे...
डिझेल चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी राम पाण्या पवार याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दरोडा, घरफोडी, चोरी यासारखे एकूण 27 वेगवेगळे गुन्हे दाखल असून, इतर आरोपींवर देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून प्लास्टिकच्या अंदाजे 35 ते 40 लिटर क्षमतेच्या वेगवेगळ्या रंगाचे डिझेलने भरलेले 45 कॅन आणि चाळीस रिकामी कॅन मिळून आली. त्याचप्रमाणे चार ट्रक, 1540 लिटर डिझेल, डिझेल काढण्यासाठी वापरण्यात आलेले हातपंप, 220 फुट छोटा बांगडी पाईप, 42 हजार 700 रुपयांची रोख रक्कम, आठ मोबाईल हँडसेट असा 98,49,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परराज्यातही आहेत गुन्हे दाखल...
रामा पाण्या पवार हा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्या साथीदारांची टोळी गुजरात राज्यातील तापी नदीतून वाळू भरून उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री करण्यासाठी आणत होती. या टोळीने आजपर्यंत महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यात अनेक गुन्हे केले आहेत. कर्नाटक राज्यात दहा ते बारा आणि गुजरात राज्यात नऊ ते दहा डिझेल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली या टोळीने दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात राज्यात सदरील टोळीने 56 पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. या टोळीकडून डिझेल खरेदी करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहोत. कामगिरी करणाऱ्या पोलिसांना 35 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, सैफो सय्यद जिया, वसंत लटपटे, पो.हे.कॉ श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, विक्रम देशमुख, नामदेव शिरसाठ, बाळू पाथ्रीकर, किरण गोरे, प्रमोद खांडेभराड, संजय देवरे, पो.ना शेख नदीम, वाल्मिक निकम, संजय भोसले, राहुल पगारे, नरेंद्र खंदारे, योगेश करमाळे, पो.कॉ ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, जीवन घोलप यांनी केली.