छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : धुळे सोलापूर महामार्गावर सध्या विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी लोखंडी संरक्षण गार्डची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर (एम एच 20 जीई 1085) हा सामान घेऊन तिसगावकडे जात होता. ट्रॅक्टर तिसगाव पूल उतरून ए. एस क्लबच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. अचानक ट्रॉलीला असलेले दोन्ही चाकण निखळले आणि ट्रॉली खाली पडली. त्यावेळी मागून भरधाव येत असलेल्या कारची काच फोडून लोखंडी धारदार असलेले संरक्षण गार्ड आत घुसले, अन क्षणात कारचालकाचे शीर धडावेगळे झाले आणि मागच्या सीटवर पडले. मृतकाच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रानुसार रोहिदास पाटीलबा उशीर (वय56) असे त्यांचे नाव असल्याची माहिती मिळाली. हा भीषण अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाला आहे.
कारचा दरवाजा तोडला : महामार्गावर चालणारा ट्रॅक्टर आणि कार दोघांचीही गती अधिक होती. त्यामुळे जोरात झालेल्या धडकेत कार लॉक झाली असल्याने, चालकाचा मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोळंबा देखील निर्माण झाला होता. तिथे असलेल्या लोकांनी लोखंडी रॉडच्या मदतीने दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. तर दुसरीकडे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आता गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
वाहतुकीचे नियम धाब्यावर : सामानाची वाहतूक करताना काही नियम परिवहन विभागाने जाहीर केले आहेत. त्यात मोठ्या वाहनांमध्ये नेत असलेले साहित्य हे वाहनाच्या बाहेर असू नये, असा नियम आहे. तरीदेखील ट्रक, ट्रॅक्टर, कधी लोडींग रिक्षा यामध्ये लोखंडी गज, सळई, पत्रे सर्रास नेले जातात. ही वाहतूक करत असताना बाहेर आलेलो साहित्य जीव घेणे ठरू शकतो याचा प्रत्यय झालेल्या अपघातात समोर आला. वेगाने जात असताना दोन वाहनांमध्ये किती अंतर असावे, याकडे देखील वाहनचालक लक्ष देत नाहीत. परिणामी, अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
हेही वाचा :