वैजापूर (औरंगाबाद) : शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे ( Shivsena MLA Ramesh Bornare ) यांच्याविरुद्ध राजकीय दबावाखाली पोलीसांनी दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वैजापूर शहर बंदची हाक दिली ( Ramesh Bornare molestation offense ) होती. त्यामुळे सकाळी 8 वाजेपासून ते दुपारपर्यत स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. स्थानिक पोलीसांनी आमदार बोरनारे यांच्या विरोधातील विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकानी केली आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
कारवाई न केल्यास या प्रश्नावर शिवसेना आणखी तीव्रतेने या विषयावर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा वैजापूरचे माजी नगराध्यक्ष सबेर खान यांनी दिला आहे. शिवसेनेतर्फे पुकारण्यात आलेल्या वैजापूर बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. आमदार रमेश बोरनारे यांच्यावर राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केल्याने त्याचा निषेध म्हणून शहरात बंद पाळत असून हा गुन्हा मागे न घेतल्यास शिवसैनिक आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.
विशेष पोलिस महानिरीक्षकांना आमदार आंबदास दानवे यांचे निवेदन
आमदार रमेश बोरनारे यांच्या कौटुंबिक वादातून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला हाेता. भाजपच्या दबावानंतर महिनाभरानंतर पोलिसांनी हे कलम वाढवताच आता शिवसेनेने कलम कमी करण्यासाठी दबावतंत्र सुरू केले अाहे. शिवसेनेने विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांची भेट घेऊन विनयभंगाचे कलम कमी करण्याची मागणी केली. औरंगाबाद शहरात आमदार अंबादास दानवे ( MLA Ambadas Danve ) यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात बोरनारे गेल्या २५ वर्षांपासून पक्षाचे काम करत असून त्यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे दाखल झाले. मात्र, स्त्रीचा विनयभंग केल्याचा गुन्हा हे एक षड्यंत्र आहे. विरोधकांनी राजकीय आकसापोटी दबाव आणून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.