औरंगाबाद - अनैतिक संबंधात अडसर ठरणार्या प्रेयसीच्या चिमुरडीला प्रियकराने वाटी तापवून चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही, तर चिमुकलीच्या ओठांना रक्त निघेपर्यंत चावा घेतल्याने ती आरडा-ओरड करू लागली. यामुळे आरोपीने त्या चिमुकलीला पुन्हा बेदम मारहाण केली. या मारहाणीत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हा प्रकार मुकुंदवाडी भागात घडला असून या प्रकरणी चिमुकलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या आईसह प्रियकराविरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राहुल रावसाहेब पवार, असे संशयित प्रियकराचे नाव आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पैठण तालुक्यातील पोरगाव येथील महिलेच्या पतीला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा आजार झाला आहे. त्यानंतर काही दिवसातच ती महिला तिच्या तिन्ही मुलांसह घर सोडून आरोपी राहुल सोबत मुकुंदवाडीत राहू लागली. पण, तिची मुले अनैतिक संबंधात अडसर ठरत होती. त्यामुळे प्रियकर राहुलने ५ वर्षीय चिमुकलीला बाहेर जाण्यास सांगितले. चिमुकलीने न ऐकल्यामुळे राहूलने गॅसवर वाटी गरम करून तिच्या सर्वांगाला चटके दिले. एवढेच नाही तर तिच्या ओठाला जबर चावाही घेतला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला २३ एप्रिलला रुग्णालयात भरती करण्यात आले.
पीडित चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याने हा प्रकार महिलेच्या भावाने तिच्या दिराला कळविला. याची माहिती कळताच चिमुकलीचे काका औरंगाबादला आले. त्यांनी पुतणीची विचारपूस केली असता, हा प्रकार समोर आला. या प्रकरणी विनयभंग, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मिरा चव्हाण करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक उद्धव जाधव यांनी दिली.