औरंगाबाद - कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज पासून सुरुवात झाली आहे. साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरण देण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातदेखील तीन ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला प्रतिसाद देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या बन्सीलाल नगर आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...
एक मार्च पासून कोरोना लसीकरणाचा महत्वाचा टप्पा आज पासून सुरू करण्यात आला. वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लस देण्यात येत आहे. त्याच बरोबर वयवर्ष 45 पेक्षा अधिक मात्र, मधुमेह, उच्चरक्त दाब यासारखे आजार असलेल्या नागरिकांनादेखील या टप्प्यात लस देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी आजाराविषयी डॉक्टरांचे पत्र अनिवार्य असणार आहे. हे पत्र दिल्यास तात्काळ नोंदणी करून कोविड लस देण्यात येईल, अशी माहिती महानगर पालिका आरोग्य कर्मचारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
खासगी रुग्णालायत आठ दिवसांनी मिळणार लस-
एक मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली असली तरी औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात अजून चार ते पाच दिवसांनी लसीकरणाला सुरुवात होईल. अद्याप ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आणि प्रशिक्षण देणे अशा अनेक बाबींची पूर्तता बाकी आहेत. त्यासाठी लवकरच खासगी रुग्णालयातील प्रमुखांची बैठक घेण्यात येईल आणि त्या बैठकीनंतर योग्य ते निर्देश दिल्यानंतरच शहरातील खासगी रुग्णालयात लसीकरणाच्या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यात येईल. त्यासाठी काही रुग्णालयाची यादी तयार करण्यात आहे, अशी माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून आला उत्साह-
कोरोना काळातील एक वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या अडचणीत ठरले. मात्र लसीकरण सुरू झाल्याची घोषणा झाल्यानंतर वृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. वृद्धांसाठी लसीकरण सुरू झाल्यावर वृद्धांनी मोठ्या उत्साहात या मोहिमेत सहभाग घेतला. औरंगाबादच्या तिन्हीही आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी दहा वाजेपासून ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. लसीकरणाच्या वेळी आरोग्य केंद्रातच नोंदणी करण्यात आली. त्यानंतर लसीकरणाबाबत माहिती दिल्यानंतर प्रत्यक्षात लस टोचण्यात आली. लस घेणे ही चांगली गोष्ट असून घेताना कुठलीही भीती वाटली नाही, उलट आनंद वाटत असल्याचे मत लसीकरण झालेल्या वृद्धांनी व्यक्त केले.