औरंगाबाद - अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने यूट्यूबवर व्हिडिओ बघून एका किरायाच्या खोलीत बनावट नोटांचा छापखाना ( Fake Currency Aurangabad ) सुरू केला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांना ( Pundaliknagar Police Station ) माहिती मिळताच हा छापखाना उद्ध्वस्त केला. यात पाच जणांना अटक करून एक लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समरान ऊर्फ लक्की रशीद शेख (३०, रा. जसवंतपुरा, नेहरू नगर), नितीन कल्याणराव चौधरी (२५, रा. मुकुंदवाडी), अक्षय अण्णासाहेब पडूळ (२८, रा. गजानननगर), दादाराव पोपटराव गावंडे (४२, रा. गल्ली क्र-१, गजानननगर), रघुनाथ चैनदास ढवळपुरे (४९, रा. गजानन नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
... अशी मिळाली पोलिसांना माहिती -
पुंडलिकनगर भागातील सुपर वाईन शॉपमध्ये बनावट नोटा देऊन दारू खरेदी केल्याचा प्रकार समोर आला होता. ही माहिती पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून तेथून दारू खरेदी करणाऱ्या मित्री रघुनाथ ढवळपुरे याला पकडले. त्याला विचारपूस केल्यावर समरान ऊर्फ लक्कीचे नाव समोर आले. तो बनावट नोटांच्या प्रकरणात २०१९ मध्ये पुंडलिकनगर ठाण्यात अटकेत होता. सात महिन्यांपूर्वीच तो जामीनावर सुटला होता. त्यानंतर लगेचच त्याने काही साथीदारांना सोबत घेऊन पुन्हा बनावट नोटांचा छापखाना सुरू केला.