औरंगाबाद - सलग ३ सर्वसाधारण सभांना गैर हजर राहिल्याने एमआयएमचे वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन आणि नगरसेविका शेख समिना यांचे पद धोक्यात आले आहे. या दोनही नगरसेवकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे रजेचा अर्ज केला आहे. मात्र, रजा मंजुरीचे अधिकार नसल्याचे सांगत महापौरांनी अर्ज मंजूर करण्यास नकार दिला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत सय्यद मतीन जयभवानी नगर आसेफिया कॉलनी तर शेख समिना संजयनगर - खासगेट भागातून एमआयएमच्या चिन्हावर निवडून आले आहेत. सय्यद मतीनने पक्ष आदेश न पाळल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सभागृहात वाद निर्माण करणे, पक्षापेक्षा वेगळी वादग्रस्त भूमिका घेणे, सभागृहात २ समाजात तेढ निर्माण करणे, असे अनेक आरोप मतीनवर आहेत.
सभागृहात सलग ३ सभांना गैरहजर राहिल्याने नियमानुसार मतीनचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते. सय्यद मतीनने जेलमध्ये असल्याचे कारण दिले आहे. तरी विषय पत्रिका दाखवल्यास न्यायालयातून सर्वसाधारण सभेत हजर राहण्याची परवानगी मिळते. त्यामुळे हे प्रकरण विधी विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर शेख समिना यांनी प्रकृती खराब असल्याचा अर्ज केल्याने महापौरांनी अर्ज मेडिकल बोर्डाकडे पाठवला आहे. त्यामुळे दोघांचे अर्ज मंजूर न झाल्याने दोघांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात, अशी तरतूद असल्याने दोघांचे नगरसेवकपद धोक्यात आहे.