औरंगाबाद - अखेर कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. औरंगाबाद विभागासाठी 64500 कोरोना प्रतिबंधक लस दाखल झाल्या आहेत. सिडको भागातील आरोग्य केंद्रात सकाळी 8 च्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूट येथून लस घेऊन वातानुकूलित कंटेनर दाखल झाला. लस दाखल झाल्यानंतर त्या वेगवेगळ्या वाहानातून इतर शहरात पाठवण्यात आल्या आहेत.
आठ जिल्ह्यांसाठी लस दाखल
औरंगाबाद विभागात येणाऱ्या आठ जिल्ह्यांसाठी दोन विभाग तयार करण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली तर लातूर विभागात लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागासाठी 64500 तर लातूर विभागासाठी 65000 लस आज पाठवण्यात आल्या. त्यात औरंगाबाद विभागातील औरंगाबादसाठी 34260, जालना 14220, परभणी 9330 आणि हिंगोलीसाठी 6650 लसी पाठवण्यात आल्या आहेत.
लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज
शनिवारी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगळी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या यंत्रणेत असलेल्या लसीचे तापमानात योग्य रहावे यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागामध्ये कोल्ड सिस्टीम सज्ज करण्यात आली आहे. विद्युत प्रवाह खंडित झाला तरीही लसीवर परिणाम होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात सर्व यंत्रणा सज्ज असून, लसीकरण करताना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितलं.
पहिल्या टप्प्यात होणार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
कोरोनाच्या महामारी नंतर लसीकरण सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलं जाणार आहे. डॉक्टरपासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सुनिल चव्हाण यांनी दिली. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदणी या अद्यापही सुरू असून त्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करत असून, लवकरच सर्वांची नोंदणी पूर्ण होईल. सरकारी आणि खासगी अशा सर्वात रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा समावेश या लसीकरणात असेल आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात इतर वर्गातील लोकांना लसीकरण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
लस दाखल होतात कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मधून पहाटे औरंगाबाद विभागासाठी लस मोठ्या कंटेनर मधून पाठवण्यात आली. आठच्या सुमारास सिडकोच्या आरोग्य केंद्रात गाडी दाखल होताच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. रुग्णालयाच्या विशेष कक्षात लसीचे बॉक्स ठेवताना कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला. या कंटेनरसोबत अनेकांनी आपला फोटो देखील काढला. लसीकरणाचा पहिला टप्पा लवकरच पार पडेल आणि त्यानंतर आपण या कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊ असा विश्वास या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.