औरंगाबाद - राज्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस देण्याबाबत प्रात्यक्षिक केले जाणार आहे. आज शुक्रवारी सकाळी नऊ ते अकरा या काळात जिल्ह्यात सिडको ऐन 11, वाळूज येथील बजाजनगर भागात आणि वैजापूर अशा तीन ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.
अशी होईल प्रक्रिया...
चाचणी करण्यासाठी 25 लाभार्त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. चार याद्या तयार करण्यात येतील, मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस तपासणी करतील. शरीराचे तापमान तपासल्यावर आरोग्य केंद्रात प्रवेश दिला जाईल. पुढे गेल्यावर लस घेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल, तिथे ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. त्यानंतर लसीकरण होईल, ऑनलाइन पद्धतीने त्याने लस घेतल्याबाबत माहिती अद्ययावत केली जाईल, तिथून लाभार्थीला अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि नंतर त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
तीन टप्प्यात होईल लसीकरण....
प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाल्यावर काही अडचणी येऊ शकतात, याबाबत चाचपणी केली जाणार आहे. तीन टप्प्यांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 37 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण , तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महसूल कर्मचारी, शिक्षक, सैनिक अस 90 हजार जणांचे लसीकरण केले जाईल. लसीकरण झाल्यावर 28 दिवसांनी पुन्हा एकदा परत आरोग्य केंद्रावर यावं लागेल. एका केंद्रावर 1 पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तैनात असतील तर 25 जणांवर होणार ड्राय रन घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.