पैठण (औरंगाबाद) - येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. डॉ. बाबर यांच्या साई हॉस्पिटलमध्ये माजी सभापती विलासबापु भुमरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. याठिकाणी उपनगराध्यक्ष संजय सोनारे यांनी प्रथम लस घेतली.
तालुक्यातील पहिलेच लसीकरण केंद्र -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी दवाखान्यांमध्येही लसीकरणाचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात यात ६० वर्षांवरील वृद्ध नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिक ज्यांना विविध व्याधी आहेत, अशा लोकांना लस देण्याचे नियोजन आहे. या लसीसाठी खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आयुष्मान भारत व इतर शासनाच्या आरोग्य योजना सेवा संलग्न हॉस्पिटल्सची यासाठी निवड करण्यात आली आहे. साई हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विष्णु बाबर यांनी दिली.
या लसीकरणाचा तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा व कोरोना साथीच्या निर्मूलनास सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक तुषार पाटील, भूषण कावसनकर, ईश्वर दगडे, सोमनाथ परळकर, संतोष सव्वाशे, जालीदंर आडसुल, जनार्दन मिटकर, संग्राम देशमुख, विजय जाधव व हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोना अपडेट : देशातील 83 टक्के रुग्ण सापडलेत 'या' सहा राज्यांमध्ये