औरंगाबाद - कोरोनामुळे परप्रांतीय मजूर मिळेल त्या मार्गाने आपापल्या गावाकडे निघाले आहेत. पुण्यात राहणाऱ्या बंगालच्या मजुरांनी एक बस ठरवून, त्यातून आपले गाव गाठण्यासाठी प्रयाण केले. पण औरंगाबादमध्ये आल्यानंतर बस चालक त्या मजूरांना तिथेच सोडून पसार झाला. यामुळे मजुरांपुढे अडचण निर्माण झाली. तेव्हा चिखलठाणा पोलिसांनी त्या मजुरांची मदत केली. त्यांनी त्या मजुरांची खाण्याची आणि राहण्याची सोय केली. दरम्यान, बंगालसाठी बस मालकाने तब्बल एक लाख रुपयांचे अॅडव्हान्स पैसे घेतले आहेत. असे मजुरांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नाही. यामुळे परप्रांतीय मजुर आपापल्या गावी निघाले आहेत. सरकार या मजुरांना रेल्वेने त्यांच्या गावी सोडत आहे. पण ज्या मार्गांवर सरकारची कुठलीही व्यवस्था नाही, त्या ठिकाणच्या मजुरांनी अवस्था बिकट आहे.
पुण्यात बंगालचे चाळीस मजूर काम करत होते. त्यांनी गावी जाण्यासाठी एक खासगी बस ठरवली. या प्रवासासाठी प्रत्येक व्यक्तीला सात हजार रुपये ठरले. मजुरांनी बससाठी एक लाख रुपयांचा अॅडव्हान्स दिला. शनिवारी ते बसमधून प्रवासाला निघाले. पण, बस व्यावसायिकाने ठरवलेली बस पाठवली नाही. तेव्हा याबाबत मजुरांनी विचारणा केली असता, त्या व्यावसायिकांने औरंगाबादमध्ये दुसरी गाडी येणार असल्याचे सांगितले.
पुढे आल्यानंतर प्रवासाची कुठलीही परवानगी नसल्याचे मजुरांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बस चालकासह व्यावसायिकाला विचारणा केली. तेव्हा परवानगीचे काय होऊन जाईल, अशी थाप बस व्यावसायिकाने मारली.
बस औरंगाबादमध्ये आल्यानंतर बस चालकाने त्या मजुरांकडे पैशाची मागणी केली. तेव्हा मजुरांनी पैसे आधीच दिल्याचे सांगितले. पण पैसे मिळाले नसल्याचे सांगत, चालकाने मजुरांना औरंगाबाद-जालना महामार्गावर उतरवले आणि तो तिथून पसार झाला.
चिखलठाणा पोलिसांना गस्त घालताना हे मजूर दिसले. तेव्हा त्यांनी त्यांची चौकशी केली. घडलेला प्रकार कळल्यावर पोलीस सहायक निरीक्षक महेश आंधळे यांनी मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. दरम्यान, पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवताच, पुण्याहून त्या बस व्यवसायिकाने काही पैसे मजुरांच्या खात्यावर जमा केले आहे. या सर्व मजुरांची प्रवासाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.